पुणे -केंद्र सरकार हे एखाद्या दारुड्यासारखं आहे. दारूडा जसं झिंगतो तसं यांच्या पॉलिसी झिंगत आहेत. ज्याप्रमाणे दारूड्याला दारू मिळाली नाही की, तो जसे घरातील सामान विकायला निघतो अगदी तशाच पद्धतीने केंद्र सरकार सार्वजनिक संपत्ती विकायला निघालं आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, मराठा सेवा संघचे अध्यक्ष राजेंद्र कुंजीर आदि मान्यवर उपस्थित होते.
मोदी सरकार एका दारूड्या सारखं आहे. दारूडा जसे दारूसाठी घरातील वस्तू विकतो, तसं केंद्र सरकार हे सार्वजनिक मालमत्ता विकायला निघालं आहे. 1990 साली एक्स्टर्नल पेमेंट वर आपलं डिफॉल्ट झालं होतं. पण अर्थव्यवस्थेवर कधीही इतका परिणाम झाला नव्हता. याच करण की, पब्लिक सेक्टर फार स्ट्रॉंग होती. आज जर तेच पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर होणार असेल, तर शासनाकडे काय गॅरंटी आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दारूड्याच्या मनात आलं की बोलतो नाही तर बोलत नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता हे हुकूमशाही सरकार आहे. हे दारूड्याच सरकार आहे. दारुड्याच्या मनात आलं की तो बोलतो आणि मनात नाही आलं की तो बोलत नाही,अशी सध्या परिस्थिती आहे. अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.