पुणे -ज्या संकटाच्या काळावर आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचे असेल तर भाजपा आणि शिवसेना (Shivsena-BJP) यांनी एकत्र यायलाच पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी व्यक्त केले आहे. 75व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघा(Brahman Sangh)कडून त्यांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते.
'बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील'
ते म्हणाले, की ज्या कारणांसाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला, ज्या कारणांसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात केली. ज्याचा मराठी माणसाला एक आधार वाटला, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला आज किती यातना होत असतील याची कल्पना फक्त जे बाहेर राहून बघताहेत, त्यांनाच होऊ शकते. त्यातला मी एक आहे. बाळासाहेबांची भाषणे ऐकून 40 वर्ष महाराष्ट्र तृप्त झाला. त्यांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ चालले आहे. ते इतके विचित्रस्थरावर चालले आहे, की त्यात महाराष्ट्राचा माणूस हा भरडला जात आहे. लोक अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाचे हे म्हणणे आहे, की हे गणित चुकले आहे. हे गणित सुधारायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.