पुणे - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा पेपर फुटी ( MHADA Paper Leak ) प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी पेपर फुटण्यापूर्वीच तिघांना पकडल्यानंतर चौकशीत कोडवर्डमध्ये बोलले जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी “घर व वस्तू", अशा शब्दांचा वापर केला जात होता. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर, असा शब्दांचा वापर होता.
माहिती देताना पोलीस आयुक्त गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल
म्हाडाची परिक्षा होण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी ( Pune Police ) डॉ. प्रितीश दिलीपराव देशमुख (वय 32 वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44 वर्षे, रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42 वर्षे, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर म्हाडाचा रविवारी होणारी परीक्षाही रद्द करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण..?
म्हाडाकडून डॉ. प्रितीश देशमुख याच्या जीए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीला परिक्षा घेण्यासाठी कंत्राट दिले होते. त्यानेच हॉलतिकीट देणे, प्रश्न पत्रिका पुरविणे व परिक्षा झाल्यानंतर ती पुन्हा घेणे त्यानंतर निकाल लागल्यानंतर ते प्रसिद्ध करण्याचे काम त्या कंपनीकडे होते. रविवारी (दि. 12) दोन सत्रात परिक्षा होणार होती. कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार होती. पण, त्यापूर्वी पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. 11) मध्यरात्रीच या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही परिक्षार्थी उमेदवारांचे ओळखपत्रक व इतर साहित्य मिळून आले होते. त्यानंतर हा पेपर फोडण्याचा डाव उधळण्यात आला. आता त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
'घर' आणि 'वस्तू' असे कोडवर्ड
पोलिसांच्या तपासात उमेदवारांशी तसेच शिकवणी संस्थेशी संपर्क साधताना थेट परिक्षेबाबत न बोलता कोडवर्ड भाषेत बोलण्यात येत होते. तसेच, अनेकांचे क्रमांकही कोडवर्डनुसार सेव्ह केल्याचे दिसून आले आहे. आरोपींमध्ये झालेले संभाषण मिळाले असून, त्यात हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका तसेच पैशांबाबत बोलणे झाले होते. त्यानुसार पोलीस या तिघांकडे चौकशी करत आहेत. म्हाडा शब्दासाठी आरोपींनी “घर” आणि पेपर शब्दासाठी “वस्तू”, असे कोडवर्ड ठरविले होते. त्यासोबतच आरोपींनी पदानुसार पैसे ठरविले असल्याची शक्यता आहे. अभियंता पदासाठी लाखो रुपये ठरल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा -Raj Thackeray Pune Visit : राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर