पुणे - मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर राज्यातील काही शाळा सुरू देखील झाल्या होत्या. परंतु लगेच दुसरी लाट आल्यामुळे शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचालींनी वेळ घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यासाठी एका सर्वेक्षणाला सुरुवात केली. या सर्वेक्षणातून 85 टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यासाठी होकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
85 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी अनुकूल
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने या सर्वेक्षणाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी http://www.maa.ac.in/survey या वेबसाईटवर सर्व पालक, शिक्षक यांना शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांचे मत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या वेबसाईटवर दोन दिवसापूर्वी आलेल्या प्रतिक्रिया पाहता 85 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी अनुकूल असल्याचं समोर आला आहे.
ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद
विशेष म्हणजे या सर्वेक्षणात ज्या ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधांची वाणवा आहे त्या ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 2 लाख 69 हजार 116 नागरिकांनी यावर आपलं मत नोंदवलं. यात ग्रामीण भागातील 1 लाख 24 हजार 16 पालकांनी शाळा सुरू होण्या बाबत अनुकूल असल्याचे मत नोंदवले होते. दरम्यान या सर्वेक्षणामध्ये 12 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत पालकांना आणि शिक्षकांना आपले मत नोंदवता येणार आहे.
15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरू
दरम्यान राज्य शासनाने नुकताच कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार 15 जुलैपासून हे वर्ग सुरू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 85 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात अनुकुलता दर्शवल्याने राज्य सरकार आता यावर नेमका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.