पुणे -राज्याच्या नगर रचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर (वय 53) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नाझीरकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्या प्रकरणी हा गुन्हा आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरवर एसीबीने केला गुन्हा दाखल - हनुमंत नाझीरकर कारवाई
नगर रचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाझीरकर यांच्या कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटी असलेल्या घरी आणि इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्त आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटी असलेल्या घरी आणि इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मालमत्तेची तपासणी सुरू आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेबाबत चौकशी सुरू होती. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी २ कोटी ७५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. नाझीरकर त्याचे स्पष्टीकरण देऊ न शकल्याने शेवटी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता नाझीरकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कमावली असल्याचे निष्पन्न झाले. नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगर रचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम पाहत होते. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली. सध्या त्यांच्या घरांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे़.