पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती दीड हजार रुपयांचा हप्ता ठरला होता. संगीता विनोद गायकवाड (वय 48) असे लाच स्वीकारलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता गायकवाड (महिला पोलीस हवालदार) या सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सांगवी येथे महिला तक्रारदार यांचे 60 फुटी डीपी रोड, पिंपळे गुरव येथे भाडेतत्त्वावर दुकान होते. सदरचे दुकान करारनामा संपूनदेखील रिकामे केले नाही, म्हणून मूळ मालकाने सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देते, तसेच मदत करते, म्हणून तक्रारदार यांच्याकडे गायकवाड यांनी ऐकून 5 हजाराची लाचेची मागणी केली. अखेर तडजोडअंती 3 हजार रुपये ठरले. त्याप्रमाणे पहिला हप्ता दीड हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, अंकुश माने, श्रीकृष्ण कुंभार यांनी केली आहे.