अबब! शंभर गुन्हे करणारा सराईत चोरटा चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात - पुणे चोरी बातम्या
हा चोरटा प्रमुखाने दुचाकी, टेम्पो, पिकअप व्हॅन ही वाहने चोरायचा. त्यानंतर या वाहनांचे पार्ट काढून तो भंगार विक्रेत्यांना विकायचा.
पुणे -तब्बल 35 वर्षापासून चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक गुन्हे केले असून त्यातील बहुतांश गुन्हे उघडकीस आले आहेत. राजू बाबुराव जावळकर (वय 55) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी त्याच्याकडून ट्रक टेम्पो आणि दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघड केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रक चोरीला गेला होता. चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी राजू जावळकर दिसून आला. त्याच्या विषयी अधिक माहिती गोळा केली असता तो सराईत गुन्हेगार असून पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली आणि त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चोरीचे सात गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपी राजू जावळकर हा मार्च महिन्यात शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली होती. तो प्रमुखाने दुचाकी, टेम्पो, पिकअप व्हॅन ही वाहने चोरायचा. त्यानंतर या वाहनांचे पार्ट काढून तो भंगार विक्रेत्यांना विकायचा.