पुणे - शहरातील शालेय विद्यार्थ्याने तयार केलेल्या रोबो ट्रॉलीचा वापर कोविड 19 रुग्णांना सेवा देण्यासाठी करण्यात येत आहे. विराज शहा या शालेय विद्यार्थ्याने ही रोबो ट्रॉली तयार केली. या रोबोटिक कोविड-१९ वॉर बॉट (ट्रॉली) च्या सहाय्याने सोमवारपासून महानगरपालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण सेवेसाठी सुरुवात करण्यात आली.
शहरातील शालेय विद्यार्थ्याने तयार केलेल्या रोबो ट्रॉलीचा वापर कोविड 19 रुग्णांना सेवा देण्यासाठी करण्यात येत आहे. वि रोबोटिक ट्रॉलीचा निर्माता विराज शहाने संबंधित ट्रॉली कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी मोफत दिली आहे. रोबोटिक कोव्हिड-१९ वॉर बॉट (ट्रॉली) निर्मिती केलेला विराज शहा सध्या लष्कर परिसरातील दस्तूर शाळेत नववीच्या इयत्तेत शिकतो. त्याला रोबोट तयार करणे, कोडिंग आणि स्पेस क्षेत्रांत अधिक आवड असल्याने त्याची सतत धडपड सुरू असते.
पुणे ते पालिताना (गुजरात) हे ९०० किलोमीटरचे अंतर त्याने आठ दिवसांत सायकलवरून पूर्ण केले होते. यासाठी त्याला पुणे महानगरपालिकेच्या वतीने "प्राईड ऑफ पुणे" गौरव पदकाने सन्मानित केले.
रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र अनेक राज्यामध्ये त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले. अशा कोरोना योद्ध्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. यातूनच त्यांने ट्रॉली बनवण्याचा निर्णय घेतला. यामार्फत रुग्णांना गोळ्या, चहा, नाश्ता, जेवण पुरवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. आधी नर्सेस आणि अन्य कर्मचाऱयांना पीपीई कीट्स घालून जावे लागते. मात्र आता रोबोट आल्याने हा धोका टळला आहे.
अभियांत्रिकी क्षेत्राचे ज्ञान नसूनही घडपडी वृत्तीने त्याने रोबोट विकसित करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याचे मित्र करण अजित शहा, वय वर्षे १९ (संगणक अभियंता विद्यार्थी) व दिप विवेक सेठ, वय वर्षे १९ (संगणक अभियंता विद्यार्थी) यांनीही विराजला सहकार्य केले. गेली ४० दिवस सातत्याने काम करत होते. मात्र, तसेच लॉकडाऊनमुळे रोबोट तयार करताना लागणारे साहित्य हवे तसे मिळत नव्हते. तरीही मिळेल त्या साहित्याची जमवाजमव करत विराजने रोबोटिक कोविड-१९ वॉर बॉटची निर्मिती केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी व कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून दिवसरात्र मेहनत करुन रोबोटिक कोव्हिड-१९ वॉर बॉट (ट्रॉली) ची निर्मिती केलेली आहे.
आता पुढील काही दिवस रोबोट मार्फत सेवा पुरवताना काही अडचणी आल्यास अथवा वॉर्डमधील रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांच्या काही सूचना मिळाल्यास त्या सूचनेनुसार रोबोटमध्ये बदल केले जातील असे विराज ने सांगितले. हा रोबोटिक कोव्हिड-१९ वॉर बॉट स्वयंपूर्ण आणि वापरासाठी एकदम सोपा आहे. यात काढण्या योग्य ३ कंपार्टमेंट्स आहेत, जे वापरल्यानंतर स्वच्छ करता येतात. हा वॉर बॉट काही मीटरच्या अंतरावरून मोबाईलच्या सहाय्याने ऑपरेट केला जाऊ शकतो. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि वेगवेगळ्या वस्तू सहजासहजी उपलब्ध झाल्यानंतर या रोबोटमध्ये कॅमेरा तसेच थर्मामीटर आणि काही अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध केली जाऊ शकतात, असे विराजने सांगितले.