पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी दत्तात्रेय कांबळे यांचा मुलगा मागील नऊ महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. तर लहान मुलाचा गंभीर आजाराने मृत्यू झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत दत्तात्रेय कांबळे यांची कुटुंबीयांना गरज असतानाही, कांबळे यांनी मात्र कोरोनाच्या लढाईत कर्तव्यावर जाणेच पसंत केले आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दत्तात्रय कांबळे आपली ड्युटी करत आहेत. परंतु, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना दत्तात्रेय कांबळे यांनी घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा...#coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील चार महिला कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दत्तात्रेय कांबळे हे कार्यरत आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि शांत स्वभावाचे कांबळे यांना दोन मुले होती. अक्षय आणि आशिष अशी त्या दोघांची नावे. सर्व काही सुखात सुरू असताना दुर्दैवाने त्यांच्या लहान मुलाला अत्यंत गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यातच त्याचा उपचारादरम्यान २००८ मध्ये मृत्यू झाला. हे थोडे की काय, दुसरा मोठा मुलगा अक्षय हा देखील आजारी आहे. त्यामुळे मागील नऊ महिन्यांपासून तो व्हेंटिलेटरवर आहे.