पुणे -शहरातील 20 मोठ्या खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार आता कोरोना रुग्णांसाठी आणखी 2 हजार बेड उपलब्ध होणार आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी तब्बल 4 हजार 426 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड कमी पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती मिळावी, म्हणून महापालिकेच्या वतीने कोविड वॉर रूम सुरू करण्यात आले आहे. मात्र या वॉर रूममध्ये सर्वाधिक तक्रारी या बेड उपलब्ध नसल्याच्या येत आहेत. त्यामुळे शहरातील 20 मोठ्या साखगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. सध्या पुण्यातल्या खासगी रुग्णालयातील साडेसात हजार बेड, कोविड केअरसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. त्यातले साडेचार हजार बेड यापूर्वीच कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता त्यात आणखी 2 हजार बेडची भर पडणार आहे.