मुंबई -कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज देशाचा 74वा स्वातंत्र्यदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सामजिक अंतर राखत ध्वजारोहण करण्यात आले. तर राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील फक्त ५ शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले आहे.
पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नागपूर - विभागीय आयुक्त कार्यालयात नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पोलीस दलातील पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना मेडल देऊन सन्मान केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यावर्षी संघ मुख्यालयामध्ये कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवडक ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारक उपस्थित होते. यानंतर सीआयएसएफ आणि पोलिसांच्या पथकाने सलामी दिली.
नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सच्या नियमांचे तंतोतंत पालन करत ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला, त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष झालेले आहे. त्यामुळे सोशल डिस्टनचे नियमाचे पालन करून, जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा पालकमंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला.
लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी हा कार्यक्रम संपवला. नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच घरी बसून हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबूक पेजवरून कार्यक्रमाचे प्रेक्षपण करण्यात आले होते. तर जिल्हाभरातील शाळांमध्ये सुद्धा फक्त ५ शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.
सांगली - राज्याचे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सांगली पोलीस दलाच्या वतीने संचलन करत मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी मंत्री पाटील यांच्याहस्ते जिल्हा क्रीडा व युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
भोकरदन (जालना) - भोकरदन नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अधीक्षक वामन आडे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांच्यासह नगरसेवक, न प कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, तहसिल कार्यालयात तहसीलदार संतोष गोरड तर जवळपास सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात त्या त्या विभाग प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
धुळे - जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. सत्तार यांनी जिल्हावासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, कोरोनाच्या वैश्विक संकटाला सामोरे जातांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील ओरोस येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील कोविड योद्धे म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम व इतर अधीकारी उपस्थित होते.
गोंदिया - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षी ध्वजारोहण गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे होत असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभाव असल्यामुळे गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालय येथे सोशल डिस्टिंग बघता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व स्वातंत्र सैनानी सहसन्माननीय व्यक्ती कोरोना योद्धे उपस्थित होते, यावेळी पालक मंत्री देशमुख यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देत जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रायगड - अलिबाग पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना संकटामुळे मुख्य ध्वजरोहण कार्यक्रम नागरिकांना पाहण्यासाठी यावेळी फेसबुक लाईव्हची सुविधा जिल्हा प्रशासनाने केली होती. ध्वजरोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्था, पत्रकार यांचा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अहमदनगर - महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या दुर्गम भागात जाऊन ध्वजारोहण केले. संगमनेर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिह्रेवाडी येथील जिल्हा परिषेद शाळेत त्यांनी ध्वजारोहण केले. जिल्ह्याच्या मुख्यालयी पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र, बाळासाहेब थोरातांकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नसल्यामुळे त्यांनी संगमनेर मतदार संघातील मुख्यालयात स्वातंत्र दिन साजरा न करता ग्रामीण भागातील एका छोट्याश्या गावात जावून ध्वजारोहण केले आहे.
तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या लोणी गावातील ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण केले. तर शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
जालना - राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले आदिंची उपस्थिती होती.
नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात 73वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा वाढत असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण मोठे असून आपण कोरोनायोद्धांना सलामकरून आपण सर्व कोरोना मुक्त होण्याचा संकल्प करू असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.
जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा शक्य ते प्रयत्न करत आहे. जनतेने देखील कोरोनाच्या या लढ्यात जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता आदी उपस्थित होते.
रत्नागिरी - 'रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आलं. या आपत्तीच्या स्थितीत शासन खंबीरपणे उभं आहे आणि या संकटावर मात करुन जिल्हा नव्याने उभा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा.' असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज रत्नागिरीत केले. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज त्यांच्या हस्ते पार पडला. रत्नागिरीतील पोलीस परेड ग्राऊंडवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दूमती जाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळयास जि.प. अध्यक्ष रोहण बने, सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडयाशेट साळवी तसेच जि.प. सदस्य आणि नगरसेवकांचीही उपस्थिती होती.