पुणे -पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरिकरण झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान ७२ अग्निशमन केंद्रे कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या शहरात केवळ १४ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत आणि तेथे कार्यरत जवानांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने आणखी केंद्रे उभारण्याची आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशामक दलाचा चिंतेचा विषय ठरला आहे.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
सध्या पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे, शहराच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या तरतुदी देखील वाढवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शहर वाढत आहे. त्याप्रमाणे आगीच्या घटना देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलातील जवानांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे.
७२ अग्निशमन केंद्र सुरू करण्याची गरज
शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने जो आराखडा तयार झाला आहे, त्यानुसार शहरामध्ये एकूण ७२ अग्निशमन केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. असे असतानादेखील शहरात केवळ १४ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. नवीन गावांच्या समावेशानंतर भविष्यात धोक्याची संख्याही वाढणार आहे. हे धोके कमी करण्यासाठी अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, हेच अग्निशमन दल सक्षम नसल्याचे दिसत आहे. अपुऱ्या अग्निशमन केंद्रांबरोबर केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. २०११ - १२ पासून अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. सध्या शहरात उपलब्ध असणाऱ्या १४ केंद्रांवर केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत, असे पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.