पुणे - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही मोहोळ म्हणाले.
शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.