पुणे -मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल 420 गावे या पावसामुळे बाधित झाली होती. तर भोर तालुक्यातील मौजे आंबवडे गावातील एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर मुळशी तालुक्यात सतत सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे सहा जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय शेती पीक व फळपिकांचे देखील कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील 420 गावांना
हवामान विभागाने 22 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. 21 जुन ते 20 जुलै या कालावधीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील 420 गावांना बसला. यातील 10 गावांना पूर्णतः तर 410 गावांना अंशतः फटका बसला. गावात, घरात पाणी शिरल्यामुळे मावळ तालुक्यातील 133 कुटुंबातील 398 व्यक्तींचे, मुळशी तालुक्यातील 10 गावातील 40 व्यक्तींचे तर भोर तालुक्यातील 33 कुटुंबातील 163 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. या कुटुंबातील व्यक्तींचे जिल्हा परिषद शाळांमध्ये, डोंगरावर असणाऱ्या गावात, आरोग्य केंद्रांमध्ये आणि नातेवाईकांच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.