पुणे- शहरातील बहुचर्चित जम्बो कोव्हिड केअर रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण बेपत्ता झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी वारंवार विचारणा करूनही रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही, तोपर्यंत जम्बो कोव्हिड रुग्णालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले.
जम्बो कोव्हिड रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब या बेपत्ता महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्या 33 वर्षीय मुलीला 29 ऑगस्टला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याच दिवशी तिला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णाची आई या घरी निघून गेल्या. त्यानंतर 13 सप्टेंबरला क्वारंटाइन कालावधी संपत असल्यामुळे त्या 12 सप्टेंबरला परत जम्बो कोव्हिड रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना उद्या येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णाच्या आई या 13 सप्टेंबरला पुन्हा गेल्या असता, त्यांना तुमची मुलगी सापडत नसल्याचे सांगण्यात आले. सापडली की तुम्हाला कळवू, असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. मुलीच्या चिंतेने रुग्णाच्या आईने त्याच रात्री नातेवाईकांसोबत जम्बो रुग्णालयात गेल्या असता, त्यांना तेथील डॉक्टरांनी तुमच्या मुलीला चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज दिल्याचे सांगितले. नातेवाईकांनी संपूर्ण पुणे शहरात शोधाशोध केली. पण त्यांनाही महिला आढळली नाही. त्यानंतर रागिणी गमरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबरला मुलगी हरवल्याची तक्रारही दिली. परंतु अद्यापही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि जम्बो कोव्हिड रुग्णालय प्रशासनाकडून मुलीविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे बेपत्ता रुग्णाच्या आईने यांनी सांगितले.