पुणे - पथदिवे बसवत असताना शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. आज(दि.30डिसें.)ला सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित प्रकार घडला असून यामध्ये एक कामगार गंभीर जखमी आहे.
लोखंडी शिडी सरकवताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लोखंडी शिडी सरकवताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सागर आयप्पा माशाळकर (वय-20) सागर कुपू पारंडेकर (वय-19) राजू कुपू पारंडेकर (वय-35) अशी मृतांची नावे असून तिघेही चिंचवडचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माशाळकर, सागर आणि राजू पारंडेकर यांसह आणखी एक कामगार हिंजवडी एमआयडीसीतील फेज तीन येथे पथदिवे बसवत होते. एका ठिकाणचे काम संपल्यानंतर हे कामगार पुढील पथदिवे बसवण्यासाठी लोखंडी शिडी पुढे ढकलत होते. यावेळी पथदिव्यांच्या जवळून जाणाऱ्या विद्युत तारेला शिडीचा स्पर्श झाला; आणि चौघांनाही शॉक लागला. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.
संबंधित कंत्राट बाबर नावाच्या व्यक्तीला दिले असून त्याच्या मार्फत हे सर्व कामगार पथदिवे बसवत होते, अशी माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.