पुणे - पिंपरी-चिंचवडमधील भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने मृत्यू झाला आहे. वेदिका राजू मुळूक (वय- 2 वर्ष रा. दिघी) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली. वेदिका आई-वडिलांसह एका लग्न सोहळ्यासाठी आली त्यावेळी काळाने तिच्यावर झडप घातली. पूर्वी राहात असलेल्या घरमालकाच्या मुलाचा लग्नसोहळा गुरुवारी होणार आहे. त्यासाठी मुळूक कुटुंब हे दोन दिवसांपासून कार्यक्रम असलेल्या घरी आले होते.
भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्याने मृत्यू - vedika death news
भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडल्याने मृत्यू झाला. एक लग्न समारंभासाठी आईवडिलांसह गेली असता, घराच्या परिसरात खेळताना हौदात पडल्याने घडली दुर्घटना.
![भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्याने मृत्यू girl dies in water tank](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9349454-thumbnail-3x2-aa.jpg)
लग्न पडले महागात-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात गव्हाणे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे जगताप कुटुंब राहात आहे. त्यांच्याकडे अगोदर मुळूक कुटुंब हे भाड्याने राहायचे, त्यामुळे त्यांची चांगली ओळख असून घरातले संबंध आहेत. घरमालक जगताप यांच्या घरी मुलाचा लग्नसोहळा असून त्यासाठी दोन दिवस झालं मुळूक कुटुंब हे चिमुकली वेदिका आणि मुलासह आले होते. बुधवारी दुपारी वेदिका घराच्या परिसरात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली.
तिचा बऱ्याच वेळ शोध घेतला ती दिसली नाही. मात्र, घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या हौदात पाहिले असता, तिचा मृतदेह दिसला. रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला होता. खेळत असताना पाण्याच्या हौदात पडली असल्याने तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी बबन मोरे हे करत आहेत.