पणजी- उत्तर गोव्यातील साखळी येथील रूद्रेश्वर मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी होणारे प्राचीन लेण्यांचे दर्शन, सतत फेसाळणारे बारमाही धबधबा यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. गोव्यातील भंडारी समाजाचे हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे समाजाच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते.
गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर डिचोली तालुक्यातील साखळी शहरापासून हाकेच्या अंतरावर हरळवे गाव आहे. विस्ताराने मोठा असलेल्या या गावात एकाच दगडात कोरलेल्या प्राचीन लेण्या आहेत. ज्या आता भारतीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहेत. तेथून पुढे गेल्यानंतर 'पांडवकालीन रुद्रेश्वर मंदिर' नावाचा फलक दिसून येतो. हेच महाशिवरात्रीबरोबरच बारमाही तीर्थक्षेत्र म्हणून गोव्यासह, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेले 'रुद्रेश्वर मंदिर ' होय.
कुडणे नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या समोरच उंच असा आकर्षक धबधबा आणि तलाव आहे. जसे भाविकांमध्ये मंदिर आस्थेचे स्थान मिळवून आहे. तसा गोव्यात येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांसाठी येथील हरवळे धबधबा मोठे आकर्षक आहे. सध्या पावसाळा असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. येथे अनेक चित्रपट आणि अल्बम यांचे चित्रिकरण झाले आहे. अभिनेते कमल हसन यांच्या लोकप्रिय 'एक दूजे के लिए' चित्रपटात याचे दर्शन होते. मंदिरात दर सोमवारी, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येत असतात.