पणजी (गोवा) - चक्रीवादळामुळे बळी पडलेल्या दोन स्थानिकांच्या कुटुंबियांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यांनाही लवकरात लवकर आपत्कालीन अर्थसहाय्य निधीतून आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. तर राज्यातील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेला परिणाम आणि नुकसानीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोव्याच्या काही भागात अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. तर ग्रामीण भागातले रस्ते अजूनही बंद आहेत. गोव्यातील नुकसानीचे नव्याने समोर आलेल्या व्हिडिओतून येथील नुकसानीची दाहकता समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा -
राज्यातील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिणाम आणि विध्वंसाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या व्यापक नुकसानीची माहिती घेतली आणि जनजीवन पूर्ववत होण्यासाठी सर्व केंद्रीय एजन्सींकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. रविवारी सकाळीच तौक्ते वादळ गोवा किनारपट्टीला धडकले होते. केरळहून गोव्यात सुमारे 147 किमी वेगाने धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने राज्याला मोठा तडाखा देत हाहाकार माजवला. दिवसभरात सोसाट्याचा वादळीवारा व धुवांधार पावासामुळे 500हून अधिक मोठी व लहान झाडे उन्मळून पडली. तर 150 घरांवर झाडे पडून तसेच छप्पर उडून नुकसान झाले, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ट्विट. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ट्विट. हेही वाचा -अरबी समुद्रात अडकलेल्या 273 जणांना वाचवण्याचे नौदलाचे प्रयत्न सुरू
तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला मोठ्या प्रमाणात फटका -
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. दोघांचा मृत्यू झाला. घरांवर झाडे पडल्याने काहीजण जखमी झाले. अनेकांच्या घरांची मोठी हानी झाली आहे. अशा सर्व नागरिकांना सरकारकडून तत्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. चक्रीवादळामुळे राज्यभरातील सुमारे ५०० झाडे कोसळून मुख्य आणि अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. उत्तर गोव्यात बार्देश, तर दक्षिण गोव्यात मुरगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून रस्त्यांत पडलेली झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चक्रीवादळ आणि पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, तो पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. सर्वच आमदार, मंत्री परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत आहेत. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) २२ सदस्यांनी रविवारी सकाळपासून प्रथम वास्को आणि त्यानंतर काणकोण, चिंचणी येथील महामार्गावरील अडथळे दूर केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आधी मुख्य, नंतर अंतर्गत मार्ग मोकळे करणार, नागरिकांनी संयम पाळावा -
राज्यात कोरोनाचा प्रसार कायम आहे. बाधितांना तत्काळ इस्पितळांत पोहोचवण्यासाठी मुख्य मार्गांवरील झाडांचे अडथळे दूर होण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रथम मुख्य आणि त्यानंतर अंतर्गत मार्गांवरील समस्या दूर केल्या जातील. याबाबत नागरिकांनी संयम ठेवून सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे. अंतर्गत मार्ग मोकळे होण्यास तसेच वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला वादळाच्या स्थितीचा आढावा -
दरम्यान, आज राज्यातील वादळाच्या स्थितीचा सर्वच खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आढावा घेतला. तर तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोव्यात इन्ट्रा-सर्कल रोमिंग (ICR) सुविधा सक्रीय करण्यात आली आहे. वादळामुळे मोबाईलचे नेटवर्क काम करत नसल्यास आयसीआर सुविधेमुळे मोबाईलच्या मॅन्यूअल सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या परिसरात उपलब्ध असलेले दुसरे नेटवर्क वापरता येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा -रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा; पहा अलिबाग किनाऱ्यावरील स्थिती