पणजी - अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर हे लोकवर्गणीतून उभारले जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद 13 कोटी कुटुंबाचे दरवाजे खटखटवणार आहे. त्याबरोबर अन्य धर्मातील लोकांनी श्रद्धेने दान केले तर त्याचाही स्वीकार करणार आहे. या अभियानाला 15 जानेवारी पासून देशभरात सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी शुक्रवारी पणजीत दिली.
राम मंदिर उभारणी निधी संकलनास 15 जानेवारीपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. ते दि. 27 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती गोवाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, विश्व हिंदू परिषद गोवाचे अध्यक्ष संतोष नाईक उपस्थित होते.
किमान १० रुपये; तर अधिक रक्कमेस आयकरातून सूट-
अलोक कुमार म्हणाले, मंदिर उभारणीसाठी जनतेपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा 1989 मध्ये विटा मागविण्यात आल्या होत्या तेव्हा 2 लाख 75 हजार गावांतून प्रतिसाद मिळाला होता. यावेळी देशभरातील 5 लाख 25 हजार गावांतील 13 कोटी कुटुंबे म्हणजे 65 कोटी हिंदू लोकांशी संपर्क साधला जाईल. दरवाजा खटखटावून निधी गोळा केला जाईल. यापैकी गोव्यात 559 गावांतील 2 लाख कुटुंबांशी म्हणजेच 10 लाख लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. किमान 10 रुपयेही स्वीकारले जातील. तर 2 हजार किंवा त्याहून अधिक रक्कम धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट ने जमा केल्यास सदर व्यक्तीला आयकरात सुट मिळविण्यासाठी लाभ मिळेल. यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा आहे. तसेच जमा झालेला पैसा 24 तासांत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा करण्यात येईल. केवळ हिंदू धर्मीय आर्थिक योगदान देतील असे नाही. तर अन्य धर्मातील लोकांनी श्रद्धेने दान केले तर तेही स्वीकारले जाईल.