पणजी - गोव्यातील अंतर्गत रस्ते यापुढे रुंद करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जलवाहतुकीकडे पाहणे गरजेचे असून याकरिता आतापासूनच काम केले पाहिजे. अन्यथा पुढील पिढ्या आम्ही काय केले? असे विचारतील, असे प्रतिपादन गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. 'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' गोवा विभाग आयोजित 'कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्स'मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना लोबो म्हणाले, गोव्यात अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याची आवश्यकता आहे. मात्र, असा काही प्रयत्न केला तर काही मंडळी तत्काळ विरोध करण्यास सुरुवात करतात. यामध्ये ज्यांनी गोव्याचे आणि देशाचे नागरिकत्व सोडले ते विदेशातून सल्ले देत असतात. आमचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे त्यांना सांगितले पाहिजे. अंतर्गत जलवाहतुकीसाठी कृती आराखड्याची गरज आहे. आम्हाला वास्तव समजून घेतले पाहिजे आणि विरोध करणाऱ्यांना तेथेच उत्तर दिले पाहिजे. तसेच गोव्यासाठी मेरीटाईम बोर्ड होणे आवश्यक आहे. यावेळी गोव्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, माजी अध्यक्ष श्रीनिवास धंपो, अँथनी गास्केल, अतुल जाधव आणि भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्ष अमृता प्रसाद आदि उपस्थित होते. गोव्यात पर्यटन उद्योगात मंदी आली आहे. दर्जेदार पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या उद्योजकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे येथे माल ने-आण झाली पाहिजे, असे लोबो म्हणाले.