पणजी - भाजपाने मला तिकीट नाकारले तरी मी अपक्ष निवडणूक लढून प्रत्येक पणजीकरांना भेटणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. त्यांनी आजपासून आपल्या मतदारसंघात घरोघरी प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल शिवाय पार्सेकर यांनी देखील वेगळी वाट धरली आहे. दोघांचेही मन वळवण्यात भाजपा नेतृत्वाला अपयश आल्याने उत्पल आणि पार्सेकर समजावण्याच्या पलीकडे असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
उत्पल पर्रीकर यांनी नुकताच पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला. आजपासून उत्पल यांनी पणजी मतदारसंघात घरोघरी जाऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल यांना मागच्या काही दिवसांपासून पणजीत विविध पक्ष व घटकांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली असून आपला गड राखण्याचे आव्हान आता भाजपसमोर उभे आहे.