महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

By

Published : Feb 24, 2021, 4:59 PM IST

Updated : Feb 24, 2021, 5:37 PM IST

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात सुमारे 40 दिवस उपचार करण्यात आले.

union-ayush-minister-shripad-naik-discharged-from-gomeco
केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

पणजी : कर्नाटकात रस्ता अपघातात जखमी झालेल्या केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना पूर्ण उपचारानंतर आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातून (गोमेकॉ) डिस्चार्ज देण्यात आला. सुमारे ४० दिवस त्यांच्यावर येथे उपचार करण्यात आले. आता त्यांची तब्येत वेगाने सुधारत आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

डिस्चार्ज मिळाल्यानंतर बोलताना यावेळी नाईक यांनी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी या कठीण काळात प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आणि कठीण काळात वेळेवर आणि सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल यांचेही आभार मानले आहेत.

नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय बांबोळीचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी आणि एम्सच्या डॉक्टरांचे पथक आणि सर्व सहाय्यकांचे आभार मानले. या कठीण परिस्थितीत सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले. आपल्याला येथे योग्य पद्धतीने आणि वेळीच उपचार मिळाले. गोमेकॉ देशातील एक महत्वाचे रूग्णालय का आहे, याचाही प्रत्यय आला. येथे असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेमुळे वेळीच उपचार मिळाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, जेव्हा अपघातग्रस्त केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉमध्ये आणण्यात आले होते. तेव्हा त्यांची तब्येत अत्यंत नाजूक बनली होती. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. मात्र, गोमेकॉमध्ये भरती केल्यानंतर तत्काळ आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जेव्हा दिल्लीतील एम्सचे वैद्यकीय पथक त्यांच्यावरील उपचारांचा आढावा घेण्यासाठी आले होते, ‌ तेव्हा आमच्या पथकाने केलेल्या उपचारांचे कौतुक करत उपचार तसेच सुरू ठेवण्यास सांगितले. नाईक यांना पहिले 15 दिवस आयसीयुत ठेवण्यात आले होते. आज ते पूर्ण बरे होऊन घरी जात आहे, यांचे समाधान आणि आनंद वाटत आहे. उर्वरित उपचार ते घरीही घेऊ शकतील.

11 जानेवारी 2021ला कर्नाटकात धर्मस्थळ येथील कार्यक्रमात उपस्थित राहून गोव्यात परत जात असताना नाईक यांच्या गाडीला अपघात झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि सहकारी डॉ. घुमे यांचा मृत्यु झाला होता. त्यांचे खाजगी सचिव आणि चालक यांना किरकोळ दुखापत झाली होती. मंत्री नाईक यांना त्याच दिवशी गोमेकॅत आणण्यात आले. त्या दिवसापासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते.

Last Updated : Feb 24, 2021, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details