पणजी -माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची धोरणे ही दूरदृष्टी असलेली आणि विज्ञानावर अधारलेली होती. गोमंतकीय मुलांचा लहानपणापासून विज्ञान-तंत्रज्ञानाकडे कल वाढावा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा वारसा पुढे नेत व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव आयोजित केला जात आहे. यामध्ये अधिकारी आणि शास्त्रज्ञांचा सहभाग असतो, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीतील दोनापावल येथे केले.
'व्हर्च्युअल' पद्धतीने महोत्सवाचे आयोजन -
गोवा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थे(एनआयओ)च्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर महोत्सव होत असल्याने 'व्हर्च्युअल' पद्धतीने घेण्यात येत आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एनआयओच्या सभागृहात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, आयोजन समितीचे अध्यक्ष जुझे मान्युअल नरोन्हा, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे सचिव अमित सतीजा, एनआयओचे संचालक सुनीलकुमार सिंग, लेखक नितीन गोखले आदी उपस्थित होते.