पणजी (गोवा) - बाणावली बलात्कार घटनेबद्दल केलेल्या चुकीच्या विधानावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत टीकेचे धनी ठरले आहेत. चहुबाजूंनी वाढलेला विरोध पाहून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलीचा दाखला देत, आपण ते विधान राज्यातील मुलींच्या काळजीपोटी केलं असून या प्रकरणी दुखावलेल्या जनतेची आपण माफी मागत असल्याचे सावंत म्हणाले.
बाणावली समुद्रकिनारी 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या प्रकरणावरून विधानसभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अशा घटना घडू नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येक वेळेस पोलिस किंवा सरकार यांवर अवलंबून राहू नये असे खेदजनक वक्तव्य केले होते. त्यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राजकारण सुरू झाले. विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत, महिला सुरक्षित नसल्याचा आरोपही केला.