पणजी- गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी मांडवीतील कँसिनो हटविणे गरजेचे आहे. परंतु, हे कँसिनो राज्यातील अन्य किनारे अथवा जमिनीवर स्थलांतरित करण्याला गोवा सुरक्षा मंचने विरोध दर्शवला असून कँसिनो किनाऱ्यापासून 5 किलोमीटरवर खोल समुद्रात नेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गोसुमं पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गोव्यातील कँसिनो हटविण्याचा प्रश्न हा केवळ कोण्या एका राजकारण्याची प्रतिष्ठा पाळण्याशी संबंधित नाही. तर गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रदूषण रोखण्याशी संबंधित आहे.
सध्या मांडवीत असलेले कँसिनो राज्यातील भाजप सरकारच्या कृपेने सुरु आहेत, असा टोला लगावत वेलिंगकर म्हणाले की, मूळ प्रस्तावानुसार कँसिनो हे 5 किलोमीटर बाहेर खोल समुद्रात असावेत. राज्याच्या कोणत्याही समुद्र किनारी अथवा नदीमध्ये स्थलांतरित करु नये. तसेच यापुढे गोव्याच्या कोणत्याही भूभागावरही नकोत. त्यामुळे, तांत्रिकदृष्टया स्थलांतराला गोवा सुरक्षा मंचचा विरोध आहे.
कँसिनो स्थलांतरास गोसुमंचा विरोध कँसिनोमुळे राज्य सरकारला केवळ 2 टक्के उत्पन्न मिळते. राजकारण्यांचे खिसे भरणारा हा धंदा येथील तरुण पिढीचा नाश करणार आहे, असा आरोप वेलिंगकर यांनी केला. ते म्हणाले की, कँसिनो नियंत्रण आणण्यासाठी गेमिंग कमिशनर नियुक्तीसारखी खोटी वचने देऊन सरकार कँसिनो हटविण्यात चालढकल करत आहे. कँसिनोंचे नेमके उत्पन्न जनतेला कळू नये हे यामागचे कारण आहे. कँसिनो पणजीतून हटवून गोव्याच्या भूमीच्या अन्य किनाऱ्यावर लावण्यास गोसुमंचा विरोध आहे. सरकारने विलंब न करता मांडवीतील कँसिनो खोल समुद्रात हलवावेत, अशी मागणीही वेलिंगकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.