पणजी -पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
पणजी विधानसभा पोटनिवडणूक : सुभाष वेलिंगकरांचा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल
स्वच्छ राजकारण करण्याची सुरुवात पणजीतून होणार आहे. त्यामुळे १०० टक्के यशाची खात्री असल्याचे सुभाष वेलिंगकरांंनी सांगितले.
वेलिंगकर यांनी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी तथा पणजी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज दाखल केल्यानंतर वेलिंगकर म्हणाले, पणजीची ही पोटनिवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची असून स्थानिक राजकारणाला दिशा देणारी आहे. स्वच्छ राजकारण करण्याची सुरुवात पणजीतून होणार आहे. १०० टक्के यशाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील २५ वर्षांत पहिल्यांदाच शेवटच्या क्षणी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. यामागील कारण काय असे विचारले असता वेलिंगकर म्हणाले, भाजपच्या सुरुवातीच्या म्हणजे उभारणीच्या काळापासून पणजीतील खाचखळगे मला माहित आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढविणार असल्याने नवखा उमेदवार देऊ नये, असे कदाचित भाजपला वाटले असेल.भाजप आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी नसून ती एकच प्रवृत्ती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, अनैतिकता यांनी बरबटलेल्या या प्रवृत्ती विरोधात लढा असल्याचे वेलिंगकर म्हणाले.