पणजी (गोवा) -ऑक्टोबर महिना उजाडताच प्रत्येकाला गोव्यातील पर्यटनाचे वेध लागतात. या महिन्याच्या १ तारखेपासून पर्यटनाचा नवा हंगाम गोव्यात सुरू झाला आहे. त्यामुळेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पर्यटनासाठी आपला कृती आराखडा तयार झाल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली.
राज्यात ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटनाचा नवा हंगाम सुरू झाला असून देशीविदेशी पर्यटकांना आत्तापासूनच गोव्यातील विविध फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत. राज्यात दोन वर्षांपासून कोलमडलेल्या पर्यटनाला उभारी देण्यासाठी सरकारने नव्याने पुन्हा एकदा कृती आराखडा तयार केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सरकारच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नववर्ष स्वागत महोत्सव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्निवल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सव, गोव्याचा प्रसिद्ध शिमगोत्सव यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
पर्यटनाची घडी पुन्हा नव्याने बसविणार- पर्यटनमंत्री
राज्यात सध्या कोरोनाचे प्रमाण घटत असून दोन डोस घेणाऱ्या पर्यटकांचे व नागरिकांचे प्रमाण देशात व राज्यात अंतिम लक्षणीय आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार आहे. राज्यातील मंदिरे, समुद्रकिनारे, चर्च हीच गोव्याची खरी संपत्ती आहे. त्यातून निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध गोव्याचे पर्यटन हे राज्याच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे पर्यटनाला नव्याने चालना देण्यासाठी सरकारचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली आहे.
ड्रग्ज घेणारे पर्यटक आम्हाला नकोत -
गोवा ही ड्रग्जची पंढरी मानली जाते. येथे अनेक देशी-विदेशी पर्यटक खुलेआमपणे अंमली पदार्थांचे सेवन करतात. अनेक रेव्ह पार्ट्याही गोव्यातील समुद्री भागात होत असतात. त्यामुळे गोव्याचे नाव देशासह जगाच्या नकाशावर उमटले जाते. त्यामुळे आगामी काळात हा ठसा पुसण्यासाठी कठोर अंमलबजावणी करून ड्रग्ज घेणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आल्याची माहितीही पर्यटनमंत्र्यांनी दिली.