मुंबई -गोव्यात सत्ताधारी पक्षाला सत्तेवर येण्यासाठी 30 टक्के मते पुरेशी असताना छोटे पक्ष मात्र सुमारे पंधरा टक्के मत मिळवताना दिसत आहेत. ( Small Parties Voteshare Goa Assembly Election 2022 ) छोट्या पक्षांच्या मतामुळेच काँग्रेस आणि भाजपसारख्या दिग्गज पक्षांना झुंजावे लागत आहे.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये नेहमीच लढत पाहायला मिळते. मात्र, आता आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनीही गोव्यात शिरकाव करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ही यावेळी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी चालवली आहे. एकूणच आतापर्यंत छोट्या पक्षांनी घेतलेल्या मतांमुळे मोठ्या पक्षांना झगडावे लागत होते.आता मोठ्या पक्षांची अधिक दमछाक होण्याची शक्यता आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी
गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला होता काँग्रेसने १७ जागा जिंकत २८.४ टक्के मते मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने १३ जागा जिंकत ३२.५ टक्के मते मिळवली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते त्यांना ११.३ टक्के मते मिळाली होती. तर ३ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यांनीही सुमारे ११.१ टक्के मते मिळवली होती.