पणजी - देशव्यापी लॉकडाऊनमध्ये गोव्यात अडकलेल्या जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या प्रदेशातील 728 नागरिकांना घेऊन सोमवारी संध्याकाळी श्रमिक एक्स्प्रेस (01606) उधमपूरच्या दिशेने रवाना झाली. उधमपूरला गोव्यातून जाणारी दुसरी तर कामगारांना दुसऱ्या राज्यात घेऊन जाणारी तिसरी रेल्वे आहे.
दक्षिण गोव्यातील मडगाव स्थानकावरून रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी ही रेल्वे कोकणरेल्वे मार्गाने रवाना झाली. तत्पूर्वी सर्व प्रवाशांना कदंब गाड्यांनी फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकत्रित आणण्यात आले. नोंदणी झालेल्या प्रवाशांमध्ये कोविड-19 च्या लक्षणांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना रेल्वेच्या दिशेने सोडण्यात आले. हे सर्व दक्षिण गोवा न्यायदंडाधिकारी अजित रॉय यांच्या देखरेखीखाली पार पडले.
या रेल्वेने 728 प्रवासी प्रवास करत आहेत. ज्यामध्ये 8 विद्यार्थी आहेत. जे बेळगाव (कर्नाटक) येथून रेल्वेसाठी रस्तामार्गाने आले होते.
या नागरिकांसाठी जम्मू आणि काश्मीर असोसिएशनने गोवा सरकारशी संपर्क साधून नागरिकांना आपल्या राज्यात परतण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. उधमपूरच्या प्रवासाला निघालेल्या या प्रवाशांची माहिती जम्मू काश्मीरमधील विविध जिल्हे आणि लडाख केंद्रशासित प्रदेश येथील जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना देण्यात आली आहे. ज्यामुळे तेथे पोहचल्यानंतर त्यांना योग्य ठिकाणी पोहचविण्यासाठी व्यवस्था करणे शक्य होणार आहे.