पणजी- सभापती हा सर्वांसाठी सारखाच असतो. त्या पदावरून सभागृहात अथवा बाहेर प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. माध्यमांसमोर भूमिकाही मांडू शकत नाही, की गोमंतकीयांचे प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे या पदासाठी मी इच्छुक नाही, असे मत उपसभापती तथा हंगामी सभापती मायकल लोबो यांनी आज व्यक्त केले. गोवा सरकारच्या वतीने सभापती निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर त्यांना विचारणा केली असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
१७ मार्च ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर सभापतीपदावरून डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिकामी आहे. त्याचा ताबा उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे देण्यात आला आहे. सरकारने बहुमत ठरावही मंजूर केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गोवा सरकारने पणजी पोटनिवडणूक जाहीर केली. १९ मे रोजी होत असून दुसऱ्या दिवशी (दि.२० मे) नवीन सभापती निवड करण्यासाठी हालचाल करत असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसने केला होता. यासंदर्भात लोबो यांच्याशी संवाद साधत ते या पदासाठी इच्छुक आहेत का? असे विचारले असता, ते बोलत होते.
लोबो म्हणाले, सरकार अशा प्रकारची हालचाल करत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप काही सांगितलेले नाही. शिवाय २३ मे ला पोटनिवडणुकीचा निकाल येणार आहे. त्यामुळे पूर्ण २० ही सदस्य सभागृहात असतील. सभापती निवड प्रक्रियेत सहभाग हा प्रत्येक सदस्याचा अधिक आहे. मात्र, मी या पदासाठी इच्छुक नाही.