पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री अथवा देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नव्हे, तर कर्तृत्वामुळे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा जनमानसावर प्रभाव दिसतो. अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पर्रीकर यांना आज श्रद्धांजली वाहिली. गोवा सरकारच्या वतीने कला अकादमी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मनोहर पर्रिकर यांच्या श्रध्दाजंली सभेत बोलताना राजनाथ सिंह
या सभेला गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा सदस्य तथा गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष आणि नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, आणि अन्य खात्यांचे मंत्री, उद्योजक श्रीनिवास धेंपो आदी उपस्थित होते.
भाजप सत्तेत आला, तेव्हा मंत्रीमंडळ बनवत असताना भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि निर्णय क्षमता असलेली व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्री म्हणून हवी होती. त्यामुळे पर्रीकर यांची संरक्षणमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी दोन वेळा एअर स्ट्राइक करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच राफेल करार मार्गी लागला असल्याचे, राजनाथ सिंह म्हणाले.
साधेपणा आणि कोणत्याही परिस्थितीत हिंमत न सोडणे हे पर्रीकरांचे गुण होते. ते आमच्यामध्ये नाहीत. परंतु, त्यांचे कार्य नेहमीच प्रोत्साहन देईल. असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. गोव्याचे राज्यपाल सिन्हा यांनी पर्रीकर हे आपले काम कसे तत्परतेने पार पाडत होते, याविषयी आठवणी सांगितल्या. यावेळी सरदेसाई, महसूल मंत्री रोहन खंवटे, तपोभूमीचे ब्रह्मेशानंद, तेंडुलकर यांनी पर्रीकर यांना आदरांजली वाहिली.