पणजी - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Traditional Dance) शुक्रवारी गोवा दौऱ्यावर होत्या. गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या गोव्यात पोहचल्या. काही दिवसांपूर्वीच गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेत असणाऱ्या भाजपला धक्का दिला होता. शुक्रवारी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रियंका गांधी यांनी केला. यावेळी प्रियंका गांधी आदिवासी महिलांना अभिवादन करताना आणि पारंपारिक नृत्य करताना दिसल्या. 45 सेकंदांचा एक व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
लाल आणि जांभळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या आदिवासी महिलांसोबत ढोलाच्या तालावर ठेका प्रियांका गांधी यांनी (Priyanka Gandhi Traditional Dance With Tribal Woman) धरला. गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत असून पुढील वर्षीही गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागा लढणार असल्याची माहिती आहे. सध्या गोव्यात भाजपाचे सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपाने मित्रपक्षांसोबत आघाडी करत काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवलं. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.