पणजी (गोवा) - गोव्याचा विकास कोणा एकामुळे अथवा एका सरकारच्या कार्यकाळात झालेला नाही. तर गोवा मुक्तीपासून राज्याची विकास यात्रा सुरू झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (शनिवारी) पणजीत केले. गोवा मुक्ती हिरकमोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी आझाद मैदानावरील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संबोधन. कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सरीता कोविंद आदी. व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा -...ही तर सुरुवात, तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील 'दीदी'
- हे गोव्याच्या प्रगतिशील विचारांचे उदाहरण -
गोवा मुक्ती संग्राम केवळ नागरिक स्वातंत्र्यासाठी नव्हे तर देशाशी एकरुप होण्याचा संघर्ष होता. यासाठीच गांधीवादी विचारधारा स्वीकारली गेली होती. आझाद गोमंतक दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संघटना एक होऊन मुक्तीच्या लढाईत उतरल्या होत्या. येथील लोक अतिथी देवो भवची पुष्टी करणारे आहेत. नागरिकांनी समान नागरी कायद्याचे तत्व स्विकारल्याने सांस्कृतिक आणि धार्मिक सद्भाव टीकून आहे. गोव्याच्या प्रगतीशील विचारांचे ते एक उदाहरण आहे. येथे होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पर्यटन क्षेत्रात अजून वाढ होणार आहे.
राज्यपाल कोशारी म्हणाले, गोवा 1961मध्ये पोर्तुगिजांपासून मुक्त झाला असला तरीही लढाई अपूर्ण आहे. आम्हाला गोव्याला तेथे पोहचवायचे आहे, जे स्वातत्र्यसैनिकांचे स्वप्न होते. सौहार्द, समन्वय आणि शांतीने रात्रंदिन काम करुन गोव्याला सर्वोत्तम बनविले पाहिजे. ज्यामुळे येणाऱ्या काळात एकदिवस गोवा हॅपिनेस इंडेक्समध्ये अव्वल असेल.
- आगामी सहा दशकांची ब्लू प्रिंट बनविण्यासाठी कार्यक्रम -
गोवा सार्वभौम भारताचा भाग असताना नवगोमंतक साकारण्यासाठी सर्व धडपड आहे. मागील साठ वर्षांत काय साध्य केले आणि पुढील 60 वर्षांत काय करायचे आहे, याची ब्लू प्रिंट (आराखडा) तयार करण्यासाठी हिरकमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. नवगोमंतकाची मुहुर्तमेढ रोवायची आहे. सर्वव्यापी, सर्वस्पर्शी प्रशासन देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. तसेच गोवा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
- गोमंतकीयांनी सैन्यात भरती व्हावे -
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बंद खाणव्यवसाय आणि कर्नाटक-गोव्यामध्ये म्हादई पाणी वाटपावरून सुरू असलेला संघर्ष याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी विकासाचा पाया रचला. भाजपमुळे गोव्याला अधिक विकास साध्य आला. खाणींचा गोव्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा आहे. भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराकडे वळावे लागेल. युवकांनी सैन्यदलात भरती व्हावे. विकास प्रकल्पांना विरोध करण्याऐवजी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.
तर विरोधीपक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, गोव्याचा वारसा जतन करतानाचा येथील युवक रोजगारासाठी विदेशात जाण्याचे थांबविण्यासाठी त्यांना त्याप्रकारे रोजगार येथेच मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे. दरम्यान, यावेळी राज्यभरातील कलाकारांचा सहभाग असलेला 'गोंयचो गाज' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी राज्यसरकार मधील आजी-माजीमंत्री, आमदार, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.