पणजी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. प्रमोद सावंतांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतली आहे. प्रमोद सावंत आता गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपा अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रमोद सावंत यांची माहिती -डाॅ. प्रमोद सावंत हे मनोहर पर्रीकर यांच्या निधना नंंतर मुख्यमंत्री झाले. सांकेलीम मतदार संघातून त्यांनी आपले नशिब अजमावले होते. सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत यांच्या पोटी झाला. त्यांनी कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून आयुर्वेद, वैद्यक आणि शस्त्रक्रियेची पदवी आणि पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक कार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले आहे.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड -सावंत यांनी 2008 च्या पाले मतदारसंघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढवली त्यांना काँग्रेसच्या प्रताप प्रभाकर गौण यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2012 ची विधानसभा निवडणूक त्यांनी सांकेलीम मतदारसंघातून लढवली. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रताप प्रभाकर गौण यांचा पराभव करत 14,255 म्हणजे 66.02% मतांनी विजय नोंदवला. त्यांनी काही काळ भारतीय जनता पक्षाच्या गोवा युनिटचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. नंतर 2017 मध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा त्यांनी 10,058 म्हणजे 43.04% मतांनी पराभव केला व ते गोवा विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले. 22 मार्च 2017 रोजी त्यांची गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
गोव्याचे 13 वे, 14 वे मुख्यमंत्री -मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त झाली. प्रमोद सावंत यांची नंतर विधानसभेने निवड केली आणि नंतर त्यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर आज दिनांक 28 मार्च 2022 रोजी त्यांनी गोव्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली.
पत्नी भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा -सावंत हे मराठा समाजाचे आहेत. त्यांचे लग्न बिचोलीम येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात रसायनशास्त्राच्या शिक्षिका असलेल्या सुलक्षणा यांच्याशी झाले. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत आणि सध्या भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा आहेत.
अल्पमतातील सरकार चालवताना चांगली कामगिरी -दुसऱ्यांदा निवडून गेलेल्या प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे संविधानिक पद असल्याने प्रमोद सावंत यांना काही काळ पक्षाशी संबंधित कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवावे लागले होते. पण विधानसभा अध्यक्षपद भूषवताना आणि अल्पमतातील सरकार चालवताना त्यांनी केलेली कामगिरी ही भाजपशी अत्यंत महत्त्वाची होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पर्रिकरांच्या निधनानंतर सावंत यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले.
सर्वमान्य नेतृत्व अशी ओळख -प्रमोद सावंत हे खूपच तरुण नेते आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच प्रशासनाशी सुसंवाद साधत त्यांनी गेल्या अडीच वर्षात गोव्याचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळला आहे. तर पक्षीय पातळीवर देखील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून प्रमोद सावंत यांना आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील सर्वमान्य नेतृत्व अशी आता त्यांची ओळख झाली आहे.