पणजी- डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यांचे सरकार गोव्यात भक्कमपणे चालत आहे. त्यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या मोठ्या गटाचा समावेश आहे, असे असताना हे सरकार अस्थिर आहे म्हणणे म्हणजे एक राजकीय विनोद आहे. दोन दशकांत पक्ष संघटनेचा पायाही न बनवू शकलेल्या शिवसेनेचे सत्तांतराचे विचार म्हणजे एक दिवास्वप्नच आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
गुरुवारी महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातही राजकीय भूकंप होणार, असे वक्तव्य केले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ढगे म्हणाले, महाराष्ट्रात 36 दिवसानंतर सत्तानाट्य घडले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात आले. या पार्श्वभूमीवर गोव्यात काही करता येईल याबाबत चाचपणी करताना काही लोक दिसतात. यामध्ये गोवा फॉरवर्ड अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार विजय सरदेसाई यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी गोव्यातही असंतोष असून सत्तांतर घडणार, असे कुठल्या जोरावर म्हटले काही कळत नाही. गोवा आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रवृत्ती आणि प्रकृती मोठे अंतर आहे.