महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यासाठी स्वतंत्र टपाल विभाग निर्माण होणार, मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

गोवा राज्यासाठी स्वतंत्र टपाल विभाग असावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वतंत्र टपाल विभाग झाल्यानंतर राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

By

Published : Oct 10, 2019, 12:19 PM IST

पणजी -गोवा राज्यासाठी स्वतंत्र टपाल विभाग असावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर यांच्याशी यासंदर्भात पत्रव्यवहार झाला आहे. त्यासंबंधी आणखी पाठपुरावा करुन स्वतंत्र टपाल विभाग निर्माण करण्यात येईल. स्वतंत्र टपाल विभाग झाल्यानंतर राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. टपाल विभागाने जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.


टपाल विभागाचे काम उल्लेखनीय आहे. जगात सर्वात विश्वासू माणूस पोस्टमन आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पत्र, मनीऑर्डर पोहचवण्याचे काम पोस्टमन करतो. टपाल खात्याचे स्वरुप आता बदलले आहे. बँकींग, पासपोर्ट सेवा ही कामं पोस्टाकडून केली जातात. मात्र, सामाजिक सुरक्षा योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. याकामी टपाल खात्याची मोठी मदत होऊ शकते. यातून अंत्योदय ही संकल्पना साकार होऊ शकते. यासाठी टपाल खात्याने निर्धारीत वेळेत उद्दीष्टे साध्य करावीत. राज्यासाठी स्वतंत्र टपाल विभागासाठी केंद्रीय आयुष मंत्र्यांनीही पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी टपाल खात्याकडे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आयुष्यावर आधारीत टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याची मागणी केली.


टपाल खाते हे समाजासोबत जोडलेले आहे. गावांमध्ये पोस्टमनची आतुरतेने वाट पाहिली जाते. पोस्टाने जपलेला हा विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. देश आणि समाजाच्या विकासात टपाल खात्याचा मोठा वाटा आहे. लोकांना जोडण्याचे काम टपाल खात्याने केले आहे. दिवसेंदिवस टपाल खात्याचा दर्जा सुधारत असल्याचे श्री नाईक म्हणाले. टपाल खात्याच्या कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी मदत होते, आणखी समाजाभिमुख कार्यासाठी नवनवीन कल्पना सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात टपाल खात्याच्या उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच टपाल खात्याच्या सुलभ वाहतुकीसाठी दोन वाहनांचा शुभारंभ करण्यात आला.

टपाल खात्याच्या सुलभ वाहतुकीसाठी दोन वाहनांचा शुभारंभ करण्यात आला.


पोस्टमास्तर जनरल डॉ एन विनोदकुमार यांनी टपाल खात्याने अवलंबलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘सुकन्या समृद्धी’ योजनेच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी स्वतंत्र पथकं शाळा, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्य करत असल्याचे डॉ विनोदकुमार म्हणाले. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पोस्ट मास्तर जनरल डॉ एन. विनोदकुमार, टपाल अधीक्षक कोरगप्पा यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी टपाल खात्याचे कर्मचारी प्रसन्ना परब यांच्या छायाचित्रावर आधारित ऑर्किड फुलांवरील टपाल तिकीटाचे प्रदर्शन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details