पणजी- गोवा निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. अजूनही अशी ठिकाणे असतील जेथे पर्यटक पोहचले नसतील. छाया पत्रकारांनी अशी ठिकाणे शोधून काढावीत ज्यामुळे पर्यटकांना पोहचण्यास मदत होईल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त गोवा छाया पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पाटो येथील संस्कृती भवनाता आयोजित कार्यक्रमासाठी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, संघटनेचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव कैलास नाईक, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्पल पर्रीकर आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालक मेघना शेटगावकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या संघटनेने पुढाकार घेत गोव्यात छायाचित्रणाचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला तर त्यासाठी सरकारतर्फे आवश्यक मदत दिली जाईल. त्याबरोबर सहभागी प्रशिक्षणार्थींना सरकारतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील विचार विद्यार्थ्यांना समाज कल्याणतर्फे शिष्यवृत्ती दिली जाईल.