पणजी - भाजपकडे १९९४ पासून आतापर्यंत असलेली पणजी विधानसभेची जागा राखण्यासाठी भाजप सर्वच नेत्यांना प्रचारात उतरवणार आहे. भाजप उमेदवारासमोर काँग्रेस आणि गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार तगडे असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज रात्री पदाधिकारी बैठक बोलावून जबाबदारी वाटून दिली.
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन रणनीती केली निश्चित
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी येथील एका हॉटेलमध्ये भाजपचे विद्यमान आमदार, निवडणूक समिती पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी आमदार किरण कांदोळकर, आमदार एलिना सालढाणा, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, सहकार मंत्री मिलिंद नाईक, संघटनमंत्री सतीश धोंड, उत्तर गोवा सरचिटणीस सदानंद तानवडे आदी उपस्थित होते.
भाजपचे दक्षिण गोवा निवडणूक समिती प्रभारी आणि पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी बैठकीविषयी माहिती दिली. 'पणजी पोटनिवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होते. चांगल्या मताधिक्याने जिंकण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. तसेच, ज्या भागात भाजप कमकुवत वाटते तेथे कसे पोहचता येईल यावर चर्चा होऊन आजी-माजी आमदारांना किमान तीन मतदान केंद्रे वाटून देण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून भाजप उमेदवाराचे कामे लोकांनी पाहिले आहे. आता झालेल्या पाच जागांच्या निवडणुकीत आम्ही ५-० असे जिंकणार' असे गुदिन्हो म्हणाले.
'आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे. आम्ही ५-० असे जिंकणार,' असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. तर, 'पणजी पोटनिवडणूक आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पणजीत ३३ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी आजी- माजी आमदार आणि मंत्री यांना प्रत्येकी तीन मतदान केंद्रे दिली जातील,' सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी सांगितले.