पणजी- प्रस्तावित पक्षांकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप आणि सतत होणाऱ्या पक्षांतरामुळे मतदारांचा उमेदवारांवर विश्वास उडत चालला आहे. मतदारांचा राजकारण्यांवरील विश्वास टिकून रहावा यासाठी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी चक्क प्रतिज्ञापत्र तयार करून पक्षांतर न करण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे.
मिरामार येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, भाजपकडून २०१५ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दोन्ही वेळच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु राजकारण बदलण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केल्याने उमेदवारी स्विकारली नाही.
मागील काही दिवस काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतर यामुळे सर्वसामान्य मतदार उमेदवार अथवा राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 'आप' उमेदवार म्हणून लोकांसमोर जाताना त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी नोटरीकरवी प्रतिज्ञापत्र केले आहे. ज्याची छायांकित प्रत मतदारांना वितरित करणार आहे.