पणजी - बुधवारी रात्री गोव्यातला कार्निव्हल (Goa Carnival) संपला आहे. आता १० मार्चला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे (Goa Election Result) लक्ष लागून राहिले आहे. गोवा निवडणुकीनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. १४ फेब्रुवारीला गोव्यातले मतदान पार पडले, तेव्हापासून सोशल मीडियावर आणि इतरत्र या निवडणुकीतील मतदारांच्या कौलाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप हे तोडून मोडून सरकार स्थापन करणार असल्याचेही बोलले जात आहे.
मागची १० वर्ष भाजपची सत्ता -
सध्या गोव्यात २०१२ पासून भाजप सलगतेने सत्तेवर आहे. या दहा वर्षांच्या काळात भाजपच्या मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रमोद सावंत या तिघांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याआधीही म्हणजे २००० सालापासून मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत झालेली गोव्यातील भाजपने लढवलेली ही पहिलीच निवडणूक आहे. मागच्या वेळेस मनोहर पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेले होते, तेव्हा भाजपने विधानसभेतील एकूण ४० जागांपैकी फक्त तेरा जागा जिंकल्या होत्या, अन काँग्रेसने सतरा जागा जिंकल्या.
२०१७ ला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचाही 2017 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा किंवा विद्यमान मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीत पराभव होणे ही त्या पक्षाच्या दृष्टीने मोठी नामुष्कीची बाब असते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा १९७७ साली रायबरेलीत असाच पराभव झाला होता, अर्थात अशाही परिस्थितीत चाळीसपैकी तेरा जागा जिंकूनसुद्धा भाजपने २०१७ला स्वतःकडे आमदार आणि सत्ता खेचण्यात यश मिळवले होतेच.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळी मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात गोव्यातले सर्वाधिक टक्के मतदान झाले आहे. हे सर्वाधिक मतदानाचे प्रमाण कुणाला फायदेशीर असू शकेल असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपने २०१७ ला तेरा जागा जिंकल्या होत्या, आता यापेक्षा अधिक किंवा बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २१ जागा हा पक्ष जिंकेल का? भाजप, काँग्रेस, आप आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यापैकी कोणताही पक्ष गोव्यात स्वबळावर सत्ता स्थापू शकण्याइतक्या म्हणजे चाळीसपैकी एकवीस जागा जिंकू शकेल अशी चिन्हे नाहीत.