पणजी (गोवा)- गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाच्या आवारातून शुक्रवारी एका महिन्याच्या मुलाचे अपहरण झाले. याप्रकरणी गोवा पोलिसांनी बाळाला स्कुटरवरून पळवून नेतानाचे अज्ञात महिलेचे सीसीटीव्ही फुटेज जरी केले आहे. तर पोलिसांची वेगवेगळी पथके कार्यरत करण्यात आली असून, मुलाच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे.
पोलिसांची विविध पथके स्थापन
गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाच्या मोकळ्या आवारातून एका अज्ञात महिलेने एका महिन्याच्या बालकाला पळविण्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली. या घटनेमुळे आवारातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पोलीस गुप्तचर यंत्रणेला कामाला लावून विविध पोलीस पथके स्थापन केली आहेत. या घटनेची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बालकाच्या शोधार्थ विविध पोलीस पथके स्थापन करून यंत्रणा गतिमान झाली आहे. संशयित महिला करासवाडा- म्हापसा येथे दिसल्याचे धागेदोरे हाती लागल्याने, उत्तर गोव्यातील पोलिसांचे या भागात झडतीसत्र व नाकाबंदी सुरु केली.
गोमेकॉतून मुलाचे अपहरण झाल्याचा आरोप चुकीचा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे मूल पळवले गेले नाही. ते मूल गोमेकॉतील रुग्णही नव्हते. केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे गोमेकॉतून मुलाचे अपहरण झाल्याचा आरोप केला जात आहे. असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले आहेत. तर गोमेकॉ रूग्णालयातील काही रुग्ण इमारतीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र रूग्णालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत ते नाहीत. या जागेत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो काही कारणास्तव बारगळला होता. तेथे असलेल्या नेस कॅफे व सोडेक्सो आऊटलेटच्या परिसरात कॅमेरे नाहीत. या घटनेमुळे हा परिसर असुरक्षित बनला आहे, असा आरोप गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामात यांनी आहेत.
महिलेशी ओळख करून पळविले मुलाला
ओडिशा येथील महिला एक महिन्याच्या मुलाला घेऊन पोलिओ डोस देण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात आली होती. येथे आवारात असलेल्या नेस कॅफे आऊटलेटच्या ठिकाणी ती मुलाला घेऊन उभी होती. ती मुलाला घेऊन एकटीच असल्याचे हेरून संशयित महिलेने तिला लक्ष्य केले. तिच्याशी तिने ओळख केली. बालकाच्या आईला नेस कॅफे आऊटलेटमध्ये खाद्यपदार्थ आणण्यास या महिलेने पाठवले. व मुलाला तोपर्यंत सांभाळते, असे सांगितले. या अनोळखी महिलेशी तिची ओळख नसताना बालकाला या महिलेकडे देऊन मुलाची आई खाद्यपदार्थ आणण्यास गेली. काही वेळाने परतली असता ती अनोळखी महिला दिसली नाही. त्यामुळे तिने या परिसरात मुलासह तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. या मुलाच्या आईने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. व या घटनेची माहिती आगशी पोलिसांना देण्यात आली.
त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज जारी
दरम्यान या महिलेच्या शोधासाठी गोवा पोलिसांनी राज्यात शोधकार्य सुरु केले आहे. विविध पथके गोव्याच्या विविध भागात दाखल करण्यात आली आहेत. नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांनी त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये सदर महिला या मुलाला एका स्कुटर स्वराच्या मागे बसून पळवून नेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या स्कुटरचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्कुटरची नंबरप्लेट तुटलेली दिसत आहे. गोवा पोलीस या मुलाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- 6 महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या 5 जणांना बेड्या