पणजी -महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत बुधवार (दि.2) पासून एकदाच वापरल्या जणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली जाणार आहे. त्याला पर्याय म्हणून गोवा हस्तकला महामंडळाने तयार केलेल्या पिशव्या माफक किंमतीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्वरीत गोवा प्रदेश भाजपच्यावतीने कार्यकर्ता मेळाला आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
कापडी पिशव्य ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होणार -
डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात दि. 2 ऑक्टोबरपासून एकदाच वापरले जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली जाणार आहे. त्याला पर्याय म्हणून गोवा हस्तकला महामंडळाने तयार केलेल्या कापडी पिशव्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आमदारांच्या बैठकीत काय निर्णय झालेत का? असे विचारल्यावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले, काँग्रेसने महात्मा गांधी यांचा केवळ वापर केला. त्यांचे विचार ना कधी आपण अमलात आणले ना लोकांपर्यंत पोहचू दिले. त्यामुळे दि. 2 ऑक्टोबर ते 30 जानेवारीपर्यंत गोवा सरकार गांधी विचार गोव्यातील 15 लाख लोकांपर्यंत अंत्योदय तत्वावर पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यासाठी आज आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये भाजपचे मंडळ पदाधिकारीही उपस्थित होते. गांधी जयंती दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये स्थानिक आमदार सहभागी होणार आहेत. पुढील सहा महिने गांधी विचार लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.
भाजप प्रवेश -
दरम्यान, मेळाव्याच्या अनुषंगाने बोलताना सावंत म्हणाले, पुढील सहा महिन्यांत राज्यभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज पर्वरी विधानसभा मतदारसंघातील सुकुर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.