पणजी -गोव्यात सापडलेल्या सातही कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सातपैकी सहा जणांना यापूर्वीच डिस्चार्ज देणात आला आहे, तर शेवटच्या रुग्णाची चाचणी आज निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. यासंबंधित गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'महालक्ष्मी' निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सावंत म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या सातवरून शून्य झाल्याचा आनंद आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करतो. असे असले तरीही गाफील राहून चालणार नाही. ३ मेपर्यंत गोव्याच्या सीमा बंदच राहणार असून लॉकडाऊनचे पालन करायला हवे. त्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्द काम केल्याने हा परिणाम दिसून येत आहे. आतापर्यंत 2 हजार घरांमध्ये 200 जणांना सरकारी क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर 200 सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. 1000 थर्मलगन खरेदी करण्यात आल्या आहेत, ज्याचा उपयोग सरकारी कार्यालयात केला जाणार आहे.