पणजी- गोव्यात सापडलेल्या सातही कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सातपैकी सहा जणांना यापूर्वीच डिस्चार्ज देणात आला आहे, तर शेवटच्या रुग्णाची चाचणी आज निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. यामुळे राज्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात यावा, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
सर्व कोरोनामुक्त व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे, असे सावंत म्हणाले. गोव्यात कोरोनाचा शेवटचा रुग्ण 3 एप्रिल रोजी सापडला. कोरोनावरील उपचारासाठी गोवा सरकारने गोवा वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रयोगशाळा आणि स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरु केले .