महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार - Sharad Pawar on Goa assembly election

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, गोव्यात स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आघाडीने निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये काँग्रेस आणि गोव्यातील अन्य समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार न्यूज
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार न्यूज

By

Published : Jan 20, 2021, 10:05 PM IST

Updated : Jan 20, 2021, 10:20 PM IST

पणजी - गोव्यात स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोवा विधानसभेची निवडणूक काँग्रेस आणि गोव्यातील समविचारी पक्षांच्या सोबतीने लढणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. संरक्षण विभागाच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून ते गोव्यात दाखत झाले आहेत.

पणजीतील पक्ष कार्यालयाला भेट देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, सुरक्षिततेच्या दृष्टीने सागरी पट्ट्याची पाहणी करण्यासाठी संसदेची संसदीय समिती गोवा दौऱ्यावर आली आहे. समितीने गोवा शिपयार्ड, कारवार येथील नौदल तळ आणि तटरक्षक दल यांची पाहणी केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे येथे दाखल झालो आहे.

गोवा विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार
गोवा विधानसभा निवडणूक काही महिन्यांत होणार आहे. यासाठी पक्षाची काय तयार आहे?, असे विचारले असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, गोव्यात स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आघाडीने निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये काँग्रेस आणि गोव्यातील अन्य समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. मात्र, या संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही. तसेच ही चर्चा राज्यस्तरावर न होता वरिष्ठ पातळीवर होणार आहे.

अन्य पक्षातून येणाऱ्यांना आमची विचारधारा मान्य हवी-
राष्ट्रवादीचे गोव्यातील एकमेव आमदार सत्ताधारी भाजप सरकारला वेळोवेळी मुद्द्यांवर पाठिंबा देत असतात याबद्दल आपली प्रतिक्रिया काय?, असे विचारले असता पवार म्हणाले, राज्याच्या हिताचा विचार करता ते योग्यच आहे. निवडलेले प्रतिनिधी सर्व जनतेला बांधील असतात.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातील आमदार जर आपल्या पक्षात आले तर प्रवेश देणार काय? या प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले, अन्य पक्षातून येणाऱ्यांना आमची विचारधारा मान्य असली पाहिजे. तसेच राज्य कार्यकारिणी त्यावर समाधानी असली पाहिजे. तसेच पक्षवाढीसाठी राज्यातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे. काही लोकांशी बोलणी सुरू आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेने निकाली काढावा-

शेतकरी आंदोलना संदर्भात ते म्हणाले, तीन ते चार राज्यातील शेतकरी पन्नास दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. याकडे सरकारने दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकारने चर्चेने हा मुद्दा निकाली काढावा.

औद्योगिक संस्था बंद पडणे योग्य वाटत नाही-
प्रदुषणकारी प्रकल्पांना गोव्यातील जनतेचा विरोध आहे, यावर आपल्या पक्षाची भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले, गोवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की, गोव्यातील स्थिती खराब होऊ नये. सरकारने अशावर लक्ष द्यावे, समाजाचे नुकसान होईल असे कृत्य करू नये. गोव्यातील संजीवनी साखर कारखाना बंद होत आहे, त्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, गोव्यातील कोणतीही औद्योगिक संस्था बंद पडणे योग्य वाटत नाही. ते अशोभनीय आहे. असा प्रकल्प दुरुस्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असेल तर आमचा पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.

यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष फिलीप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमाव व सरचिटणीस संजय बर्डे आदी उपस्थित होते.

Last Updated : Jan 20, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details