एनसीबी मुंबई पथकाकडून गोव्यात 3 ठिकाणी छापेमारी, 4 जणांना अटक
या कारवाईत 4 जणांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबीकडून गोव्यातील अंजुना, पंजिम आणि मिरामार या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
मुंबई : अमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गोव्यात तीन ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत 4 जणांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबीकडून गोव्यातील अंजुना, पंजिम आणि मिरामार या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
नायजेरियन तस्करांना अटक
गोव्यातील मजल वाडो, आसागाव या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान 41 ब्लॉट्स एलएसडी, 28 ग्रॅम चरस, 22 ग्रॅम कोकेन, 1 किलो गांजा तसेच 160 ग्रॅम व्हाईट पावडर तसंच 500 ग्रॅम ब्लु क्रिस्टल हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याशिवाय 10 हजारांची रोकडही एनसीबीने हस्तगत केलेली आहे. या प्रकरणी एनसीबीकडून उगोचुक्वॉ सोलोमोन उबाबुको आणि जॉन इन्फिनिटी उर्फ डेव्हिड कांगो या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील उगोचुक्वॉ सोलोमोन उबाबुकोला 2013 मध्ये गोवा पोलिसांकडून अटक झाली आहे. याशिवाय प्रसाद वाळके या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एलएसडी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेला अमली पदार्थ तस्कर प्रसाद वाळके हिस्ट्री शीटर असून 2018 मध्ये गोवा एनसीबीकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
दुसऱ्या कारवाईत एकास अटक
एनसीबीच्या आणखीन एका पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान गोव्यातून हेमंत साह उर्फ महाराज यास मिरामार पंजिम येथून अटक करण्यात आलेली आहे . या अगोदर एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अनुश केशवानी, रिगल महाकाल यांनी त्यांच्या एनसीबी चौकशीदरम्यान हेमंत साह याचं नाव अमली पदार्थ तस्करी प्रकरणात घेतलं होतं. मध्य प्रदेशचा असलेला हेमंत साह हा गोव्यातील मोर्जीम परिसरामध्ये श्याक बुएना वीडा नावाच हॉटेल चालवत आहे.