पणजी - जून महिना मध्यावर येऊनही मान्सून दाखल न झाल्याने सर्वांच्या नजरा त्याच्या आगमनाकडे लागल्या होत्या. अखेर मजल दरमजल करत गुरुवारी सकाळी मान्सून गोव्यात दाखल झाल्याची घोषणा गोवा वेधशाळेने केली आहे.
खूशखबर.... अखेर मान्सून गोव्यात दाखल; वेधशाळेने दिली माहिती - पाऊस
जून महिना अर्ध्यावर येऊनही मान्सूनचा पत्ता नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी मान्सून गोव्यात दाखल झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला.
मान्सून गोव्यात दाखल होत सक्रीय झाल्याची माहिती आल्तीनो-पणजी येथील गोवा हवामान केंद्राचे प्रभारी डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांना दिली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा संपली आहे. केरळमधून सुरू झालेला मान्सून कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये 14 जूनपासून स्थिरावला होता. आज मात्र मान्सून वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहे. दक्षिणेकडून वेगाने वारे येत आहेत. पुढील पाच दिवसांत गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्र खवळलेला असेल आणि वाऱ्याचा वेग ही वाढणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याच्यी सूचना देण्यात आली आहे. मागील चोवीस तासात गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद उत्तर गोव्यातील पेडणेमध्ये तर सर्वात कमी पाऊस दक्षिण गोव्यातील केपे येथे करण्यात आली.
उशिराने मान्सून गोव्यात दाखल होण्याचे कारण काय? असे विचारले असता डॉ. पडगलवार म्हणाले, 'वायू' वादळामुळे मान्सून लांबला. तरीही गोव्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. हवेतील आर्द्रता वादळामुळे पुढे सरकली गेली. मान्सून गोव्यात मागील दोन दशकात पहिल्यांदाच उशिरा सक्रीय झाला आहे. याच्या कारणांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जरी उशीर झाला असला तरीही त्याचा पावसावर काही परिणाम होणार नसून लांबणीची कसर भरून निघेल असा अंदाज आहे. तसेच भारतीय मान्सूनवरही त्याचा परिणाम होणार नाही.