पणजी - नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे. राज्यातील समुद्र किनारे, कॅसिनो आणि हॉटेल्स 30 डिसेंबरपासून ओसंडून वाहत आहेत. 2021ला निरोप देऊन 2022च्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे राज्यात कोविडचा संसर्ग वाढत चालला आहे. पॉझिटिव्हिटीचा दर 1.8 टक्क्यांवरून वाढून तो 7.23 वर पोहोचला आहे.
गोव्यात 14 लाख देशी आणि विदेश पर्यटक दाखल झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन 2022चे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे.
समुद्रकिनारे, कॅसिनो आणि हॉटेल्स फुल्ल -
गोव्याचे आकर्षक असणारे समुद्र किनारे आणि येथील निळाशार समुद्र ही गोव्याची ओळख आहे. याच समुद्रकिनारी येऊन नववर्ष साजरे करण्यासाठी अनेकजण तयार असतात. त्यामुळे कालपासून या समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. तसेच पर्यटकांच्या उत्साहाला चार चांद लावतात ते गोव्यातील कॅसिनो आणि हॉटेल्स. कालपासून कॅसिनो आणि हॉटेल्स फुल्ल झाले आहेत. हॉटेल्सचे दरही 25 ते 30 टक्क्यांनी वधारले आहेत. अनेक हॉटेल्स आणि कॅसिनोत नववर्ष स्वागतासाठी विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स आणि समुद्रातील कॅसिनोना पर्यटकांची विशेष पसंती असणार आहे.
क्रूझ पार्टीला विशेष पसंती -
समुद्रात जाऊन डीजेच्या तालावर मद्यधुंद होऊन नाचत नववर्षाचे स्वागत करणे ही गोव्यातील पर्यटकांची परंपरा आहे. त्यामुळे क्रूझ आणि बोटीवरील इव्हेंटला लोकांची विशेष पसंती आहे. त्यामुळे अनेक लोक लाखो रुपये खर्च करून अशा पद्धतीने आपले नववर्ष गोव्यात साजरे करत आहेत. कालपासून या क्रूझ पार्टीना उत आला आहे. पार्टीमध्ये सध्या परदेशी मॉडेल्सला नाचविणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे अनेक पार्टीमध्ये परदेशी मॉडेल्स नाचताना दिसत आहेत.