गोवा (पणजी)- मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Minister Pramod Sawant ) यांनी यापुढे राज्यात धर्मांतरण करण्यावर बंदी घालणार असल्याचे वक्तव्य गुड फ्रायडे ( Good Friday ) सणावेळी केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सोमवारी (दि. 18 एप्रिल) चांगलाच समाचार घेतला. राज्यातील दोन धर्मांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सावंत करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Michael Lobo ) यांनी केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ख्रिस्ती धर्मीयांच्या गुड फ्रायडे ( Good Friday ) सणावेळी राज्यात धर्मांतरण करण्यावर बंदी घालण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. सावंत यांच्या या विधानामुळे गोव्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यातच यावर राज्यातील ख्रिस्ती समाज नाराज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हे विधान निंदनीय असल्याचे लोबो म्हणाले.
कोणत्या चर्चमध्ये धर्मांतरण सुरू..? -मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना राज्यात सर्वच समाज एकसंध होता. मात्र, सावंत त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेल्यानंतर ते समाजाला दूषित करणारे वक्तव्य करत असल्याचे लोबो म्हणाले. दरम्यान, सावंत यांच्या वक्तव्यामुळे राज्यात सर्व धर्मातील लोकात चुकीचा संदेश दिला जातो. मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने गोव्यासारख्या राज्यात असे वक्तव्य करणे चुकीचे असून कोणत्या चर्चमध्ये धर्मांतरण सुरू आहे याचे पुरावे मला मुख्यमंत्र्यांनी द्यावे किंवा मला नजरेस आणून द्यावे, असे थेट आव्हानही लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री -गुड फ्रायडे सणावेळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते की, यापुढे राज्यात धर्मांतरण करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विशेष करून हिंदू धर्मात अनेक लोक गरीबी किंवा विविध प्रलोभनांना बळी पडून अन्य धर्माचा स्वीकार करतात. त्यामुळे अशा कृत्यांना राज्यात बंदी घातली जाईल. दरम्यान, सावंत यांच्या या वक्तव्याचा ख्रिस्ती धर्माने निषेध केला.
हेही वाचा -Easter day goa 2022 : गोव्यात ख्रिस्ती बांधवांचा ईस्टर उत्साहात साजरा